पाटणा (वृत्तसंस्था) बिहारमध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान राज्यातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचं आश्वासन नितीश सरकारनं दिलं होतं. आता मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपलं आश्वासन पूर्ण करण्याचा ध्यास घेतलाय. १ मार्चपासून अर्थात आजपासून देशभरात सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सर्व नागरिकांना राज्यात मोफत लस मिळेल, अशी घोषणा बिहार सरकारकडून करण्यात आलीय.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील जनतेला दिलेले मोफत कोरोना लसीचे आश्वासन पूर्ण करण्याच्या तयारीत नितीश कुमार सरकार असून आजपासून बिहारमधील खासगी रुग्णालयांतून देण्यात येणाऱ्या कोरोना लसीचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलेल, असे बिहार सरकारने म्हटले आहे. रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण देशातील खासगी रुग्णालयांत आजपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना तसेच ४५ वर्षांवरील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांत लसीच्या प्रत्येक डोसची किंमत जास्तीत जास्त २५० रुपये ठेवली आहे. पण ही लस बिहारमधील लोकांना मोफत टोचली जाणार आहे. आपण पुन्हा सत्तेत आलो, तर बिहारमधील प्रत्येक नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस मोफत दिली जाईल, असे आश्वासन भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात दिले होते. याच पार्श्वभूमीवर सरकार स्थापन झाल्यानंतर नितीश कॅबिनेटने बिहारमधील प्रत्येक नागरिकाला मोफत कोरोना लस दिली जाण्यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
आज देशभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. सोमवारी १:०० वाजता आयजीआयएमएस रुग्णालयात जाऊन तेथे नितीश कुमार यांनी लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी स्वतः देखील ही लस घेतील. आज नितीश कुमार यांचा वाढदिवसही आहे आणि याच दिवशी त्यांनी बिहारमधील जनतेला मोठी भेट दिली आहे.