नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा रोज नवीन विक्रम होत आहे. देशात कोरोनाच्या प्रसाराचा वेग प्रचंड असून, रुग्णवाढही वेगाने होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३,४६,७८६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २६४२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही नवे उच्चांक गाठत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ४६ हजार ७८६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत देशात २ हजार ६२४ जणांचे प्राण कोरोनानं हिरावून घेतले आहेत. काहीशी दिलासा देणारी बाब म्हणजे देशात २४ तासांच्या काळातच २ लाख १९ हजार ८३८ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. देशात आतापर्यंत १ लाख ८९ हजार ५४४ जणांचा मृत्यू झाला असून, देशात सध्या २५ लाख ५२ हजार ९४० रुग्ण उपचार घेत आहेत.
कोरोना संक्रमित रुग्णांच्या बरं होण्याचा दर ८३.५ इतका झाला आहे. तर, कोरोनानं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येचा दर घटून १.१ टक्के इतका झाला आहे. देशात गेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक ७७३ रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला आहे. यानंतर दिल्ली ३४८, छत्तीसगड २१९, यूपी १९६, गुजरात १४२, कर्नाटक १९०, पंजाब ७५ आणि मध्य प्रदेशमध्ये ७४ जणांचा मृत्यू झाला आहे. या आठ राज्यांमध्येच २०१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा एकूण मृतांच्या संख्येपैकी ७६.९८ टक्के इतका आहे.