जामनेर (प्रतिनिधी) पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नसतांना एकास अटक करून न्यायालयात हजर केल्याप्रकरणी जामनेर पोलीस निरीक्षक यांच्यासह पो.हे.कॉ. जयेंद्र पगारे यांना तुमच्याविरुद्ध जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे अहवाल का पाठविण्यात येऊ नये?, अशी कारणे दाखवा नोटीस न्यायालयाने नुकतीच बजाविली आहे.
या संदर्भात प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, अजीम हाफिज मिर्झा या इसमास सीआरपीसी क. ४१ (१) (ड) अन्वये दि. १९ ऑक्टोंबर रोजी अटक करून पो.हे.कॉ. जयेंद्र पगारे यांनी येथील न्यायालयात हजर केले होते. अधिक तपासासाठी मिर्झा याची तीन दिवसांची पोलिस कोठडीही मागण्यात आली. मिर्झा याचे महेंद्र बोलेरो पिकअप व्हॅन हे वाहनही पोलिसांनी जप्त केले होते. या वाहनातून मिर्झा हा काही चोरीच्या वस्तू नेत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या प्रकरणात अटक इसम मिर्झा याच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात चोरी अथवा अन्य कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. असा कोणताही गुन्हा दाखल झालेला नसतांना केवळ संशयावरून त्याला अटक करून तीन दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती.
अशाप्रकारे कोणताही गुन्हा दाखल नसतांना एखाद्या इसमास अटक करून पोलिस कोठडी मागण्याची तरतुद कायद्यात कुठेही नाही. अशा परिस्थितीत सीआरपीसी क. ४१ (१) (ड) अन्वये कुणालाही केवळ संशयावरून अटकसुद्धा करता येत नाही, असें म्हणत जामनेर तालुका न्यायाधिश डी. एन. चामले यांनी पोलिसांची कोठडीची मागणी फेटाळून लावली. तसेच मिर्झा यास केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे नमुद करून पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि तपासधिकारी पो.हे.कॉ. जयेंद्र पगारे या दोघांना तुमच्याविरुद्ध जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे कारवाईचा अहवाल का पाठविण्यात येऊ नये?, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीसही न्यायालयाने बजाविली आहे. याप्रकरणी अटक इसम अजीम मिर्झा यांच्यातर्फे अॅड. आर. बी. शेख हे काम पाहत आहेत.
संबंधित वाहनात लाखोंचा चोरीचा मुद्देमाल आढळून आला आहे. याआधीही याच वाहनातून चोरीचा माल जप्त केलेला आहे. न्यायालयात योग्य तो खुलासा सादर करणार आहोत.
– पो.नि. किरण शिंदे (जामनेर)