ठाणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला (Ketaki Chitale) 18 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केतकी चितळेविरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांतही तिच्याविरोधात तक्रार आल्यानंतर शनिवारी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले. केतकीने एका वकिलाची शरद पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट सोशल मीडियात शेअर केली. या पोस्टमध्ये अतिशय आपत्तीजनक अशा टिप्पण्या करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी तिला शनिवारी ठाणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
केतकीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील घेतला नाही. तिने स्वत:च न्यायालयात बाजू मांडली. मी पोस्ट केवळ फॉरवर्ड केली आहे. सोशल मीडियात मत मांडण्याचा आपल्याला अधिकार नाही का, असा सवाल तिने न्यायालयात उपस्थित केल्याचे समजते. त्यानंतर तिला कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, केतकी विरोधात ठाण्यातील कळवा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता नुसार कलम 500, 501, 505, 153-A अशा कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष/जिल्हा उपाध्यक्ष स्वप्निल नेटके यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.