उज्जैन (वृत्तसंस्था) उज्जैनमध्ये एका हिंदू महिलेसोबत प्रवास केल्यामुळे एका मुस्लिम व्यक्तीला १० दिवसांपूर्वी ट्रेनमधून खेचून बाहेर काढत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे सोपवले होते. मध्य प्रदेश पोलिसांनी या मुस्लिम व्यक्तीविरुद्ध आता मध्य प्रदेश धर्मांतरविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी, एका महिलेच्या तक्रारीवरून, आझाद नगर इंदौर येथील रहिवासी आसिफ शेख याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे महू पोलिस ठाण्याचे नगर निरीक्षक अरुण सोलंकी यांनी सांगितले. “महू येथील एका २५ वर्षीय महिलेशी जबरदस्तीने लग्न केल्याप्रकरणी या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीत महिलेने, “आसिफ शेख हा तिच्या पतीचा मित्र आहे. तो अनेकदा तिच्या घरी जायचा. काही महिन्यांपूर्वी शेखने तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढले होते. शेखने महिलेची बदनामी करून तिला धमकी दिली. तो तिला पैशांसाठी ब्लॅकमेल करत होता. त्याने माझ्यावर लग्नासाठी धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली होती,” असे म्हटले आहे.
महिलेने तक्रारीत तिच्यावर दबाव होता आणि तेच तिला सांगितले जात होते, असे म्हटले आहे. “१४ जानेवारीला आरोपी तिला जबरदस्तीने अजमेरला घेऊन जात होता. काही लोकांनी तिला अडवल्याने ती घाबरली आणि तिने पोलिसांकडे कोणतीही तक्रार केली नाही. पण आता तक्रार देण्याचे धैर्य एकवटले आहे,” असे महिलेने म्हटले आहे. या तक्रारीनंतर पोलीस आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
याआधी १४ जानेवारी रोजी उजव्या विचारसरणीच्या संघटनेचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या पिंटू कौशल आणि इतर काहींनी शेखला उज्जैन रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून खेचत बाहेर काढले आणि पोलिसांकडे सोपवले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कौशलने नंतर दावा केला की विवाहित हिंदू महिलेची एका मुस्लिम पुरुषाने फसवणूक केली होती आणि ते लग्नासाठी अजमेरला जात होते.
“आम्हाला माहिती मिळाली आणि त्याला ट्रेनमधून बाहेर काढण्यात आलं. ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याने पोलीस कारवाईसाठी आम्ही त्यांना जीआरपी, उज्जैनच्या ताब्यात दिले,” असे कौशल यांनी म्हटले. दरम्यान, जीआरपी उज्जैनच्या पोलीस अधीक्षक निवेदिता गुप्ता यांनी सांगितले होते की, पुरुष आणि महिला हे कौटुंबिक मित्र आहेत आणि महिलेच्या आईने याची माहिती दिली आहे, म्हणून आम्ही त्यांना जाऊ दिले.