धरणगाव (प्रतिनिधी) पावसाळा सुरु झाल्यानंतरही धरणगावातील ‘जलसंकट’ कायम असल्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. धरणगावकरांची अक्षरशः रात्रभर पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. यामुळे नगरसेवकांवर टॅकरने पाणी पुरवठा करण्याची पुन्हा एकदा नामुष्की ओढवली आहे.
धरणगावात सध्या १५ नंतर पाणी पुरवठा केला जात आहे. अगदी पावसाळा सुरु झाल्यानंतरही पाण्याची समस्या कायम आहे. दुसरीकडे पंधरा दिवस पाणी साठवण करुन ठेवले तर त्यात अळ्या कीडे निर्माण होतात. त्यामुळे साठवण करुन ठेवणं ही कठीण समस्या असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. अनेक महिलांना दूर विहिरीवरुन डोक्यावर पाणी आणावं लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कूपनलिका खोदण्यात याव्या, त्याचबरोबर बंद अवस्थेतील कूपनलिका तातडीने दुरुस्त करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, दुसरीकडे शहरातील काही सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक शहरातील विविध भागात पाणी पुरवठा करत आहे. खरं म्हणजे ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे, त्या गोष्टीचा देखील प्रोपोगंडा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. दुसरीकडे अमुक अडचण आहे, ढमुक कोटीचे काम सुरु आहे. पाईप लाईनचे काम सुरु आहे. धरणगावची पाणी टंचाई लवकरच संपुष्टात येईल, अशी प्रशासनाचे नेहमीचे ठरलेले उत्तर देत असते.