पुणे (वृत्तसंस्था) मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच असलेला के पी गोसावी याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात पंच असलेला के पी गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. के पी गोसावी याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. अखेर पुणे पोलिसांनी के पी गोसावी याला ताब्यात घेतलं आहे.
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी आणि आर्यन खान अटक प्रकरणातील एनसीबीचा पंच तसेच परदेशात नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला फरार आरोपी के पी गोसावीला आज सकाळी पुणे पोलिसांनी अटक केली. कालच संध्याकाळी के पी गोसावी पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. कालपर्यंत तो शरण आला नाही. अखेर पुणे पोलिसांनी आज त्याला अटक केलंय. आज दुपारी त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
के. पी. गोसावी नेमका कोण?
किरण गोसावी हा परदेशात नोकरी मिळवून देणाऱ्या के. पी. जी. ड्रीम्स रिक्रूटमेंट कंपनीचा मालक असल्याची माहिती आहे. के. पी. जी. ड्रीम्स कंपनीचं मुंबई आणि नवी मुंबईत कार्यालय आहे. बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, खासगी गुप्तहेर अशीही के. पी. गोसावी याची ओळख आहे. गोसावी स्वत:च्या वाहनावर पोलिसांची पाटी लावून फिरताना कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय नवाब मलिक यांनीही तसा दावा केला होता.
अटक करण्यात आलेलं प्रकरण काय?
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवलेलं आहे. याच किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात नोकरी देण्याच्या आमिषाने लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. पालघर तालुक्यातील एडवण या गावातील दोन तरुणांचीही त्याने दोन वर्षांपूर्वी फसवणूक केल्याचा आरोप झाला आहे. उत्कर्ष तरे आणि आदर्श तरे या दोन तरुणांना मलेशिया येथे कामाला लावतो असे सांगून त्यांच्याकडून दीड लाखाची मागणी गोसावी याने केली होती.