पुणे प्रतिनिधी । पोलिसांनी शहरात पुढील पंधरा दिवस म्हणजे येत्या (दि.५ ऑक्टोबर) पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले असून जमावबंदी लागू केली आहे. पुण्याचे सहपोलीस आयुक्तांनी या आदेशानुसार शहरात आंदोलन निदर्शनांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती दिली.
कोरोनाचा संसर्ग शहरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पुणे जिल्हा देशात सर्वाधिक रुग्ण असणारा जिल्हा म्हणून समोर येत आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकारने टाळेबंदी लागू केली आहे. कोरोनाचा संसर्गामुळे शहरात यापूर्वी लागू करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश कायम राहणार आहेत.
जमावबंदीचे आदेश सार्वजनिक ठिकाणी लागू केले आहेत. तर सभा, आंदोलने, निदर्शनांवर बंदी घातली आहे. आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा डॉ. शिसवे यांनी दिला आहे. कोरोनाचा संसर्ग विचारात घेऊन प्रत्येकाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. नागरिकांनी पुरेशी काळजी घेऊन सर्व व्यवहार पार पाडावेत, असे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.