नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बॉलिवूड आणि दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेता रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची घोषणा केली. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूचाही समावेश आहे. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुपरस्टार रजनीकांत यांना पुरस्कार देण्यात आला का, असा प्रश्न जावडेकर यांना विचारण्यात आला. मात्र, या प्रश्नावर जावडेकर यांनी सडेतोड उत्तर दिले.
चित्रपट सृष्टीत अमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. यावेळी त्यांना रजनीकांत यांना जाहीर झालेला पुरस्कार आणि तामिळनाडू विधानसभा निवडणूक यावरून प्रश्न विचारण्यात आला. ‘तामिळनाडूमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे रजनीकांत यांना दादासाहेब पुरस्कार दिला जात आहे का?,’ असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाने प्रकाश जावडेकर चांगलेच संतापले. त्यांनी लागलीच त्या प्रश्नाला उत्तरही दिलं. जावडेकर म्हणाले, “हा पुरस्कार सिनेसृष्टीशी संबंधित आहे. पाच जणांच्या निवड समितीने एकमताने रजनीकांत यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यात राजकारण कोठून आलं? प्रश्न नीट विचारले पाहिजेत,” असं जावडेकर यांनी सुनावलं. पुढे बोलताना जावडेकर म्हणाले,”रजनीकांत हे मागील पाच दशकांपासून सिनेसृष्टीत आहेत. लोकांचं मनोरंजन करत आहेत. चित्रपटसृष्टी गाजवत आहेत. त्यामुळे दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीने त्यांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. पाच सदस्यीय निवड समितीने एकमताने हा निर्णय घेतलेला आहे.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते. मात्र, अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवण्यात आले. बरे होऊन घरी परतल्यावर, रजनीकांत यांनी प्रकृतीचे कारण देत सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले होते.