मुंबई (वृत्तसंस्था) देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. गेल्या ३आठवड्यांपासून कोरोनाची लाट ओसरताना दिसत असून राज्यात कोरोनामृत्यूतही विक्रमी घट झाली आहे.
दिवसभरात ९ हजार ९०५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून राज्याचा करोना रिकव्हरी रेट वाढून ८९ टक्क्यांवर पोहचला आहे. तर दुसरीकडे राज्यातील अँक्टिव्ह अर्थात उपचार घेत असलेल्या करोना बाधित रुग्णांचा आकडा १ लाख ३४ हजारापर्यंत खाली आला आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहचले असून तरी आज गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज ९ हजार ९०५ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर राज्यात आतापर्यंत एकूण १४ लाख ७० हजार ६६० करोना बाधितांनी या आजाराला मात दिली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण८९.२ टक्के इतके झाले आहे. आज राज्यात ३ हजार ६४५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर ८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ८६ लाख ४५ हजार १९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ४८ हजार ६६५ नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात २५ लाख ३० हजार ९०० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर १३ हजार ६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यातील अँक्टिव्ह रुग्णांचा आकडा झपाट्याने खाली येत असून आजघडीला एकूण १ लाख ३४ हजार १३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे पुणे जिल्ह्यातील अँक्टिव्ह रुग्णांचा आकडा २४ हजार ३५२ इतका खाली आला आहे. मुंबई पालिका हद्दीत १७ हजार ८६० अँक्टिव्ह रुग्ण आहेत तर ठाणे जिल्ह्यात २० हजार ८२० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.