जळगाव (प्रतिनिधी) कोरोना (corona) प्रादुर्भावामुळे यंदाही ‘थर्डीफर्स्ट’ घरातच साजरा करावा लागणार आहे. यावर्षीही कोरोनाच्या निर्बंधांमुळे हॉटेल्स, बिअरबार, ढाबे यांना थर्टीफस्टच्या रात्री होणाऱ्या व्यवसायाला तिलांजली द्यावी लागणार आहे. रात्री नऊनंतर जमावबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे (Jalgaon collector) आदेश आहेत. मात्र, कालपासूनच पोलिस कोरोना निर्बंधाचे कारणे देत बिअर शॉप, हॉटेल्सवर रात्री दहानंतर गस्त घालून बंदची सक्ती केली जात आहे.
आतापासूनच पोलिसांची गस्त
अगोदर कोरोनाचा मूळ प्रकार नंतर डेल्टाप्लस व आता ओमायक्रोन अशा नावाने कोरोना रूप पालटत आहे. दरम्यान, थर्टीफस्ट डिसेंबरची रात्र म्हणजे तळीरामांसाठी एक पर्वणी असते. थर्टीफस्टनिमित्त अनेक मोठी हॉटेल्स, ढाबे, बिअरबार चालक विविध स्पर्धा, विविध प्रकारचे ‘शो’ आयोजीत करत ग्राहकांना आकर्षित करून आपला व्यवसाय करून घेतात. मागील वर्ष निर्बंधामुळे थर्टीफस्ट डिसेंबरची रात्र साजरी करता आली नाही. यावर्षीतरी चांगला व्यवसाय मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा, मनोरंजनाचे कार्यक्रम हॉटेल्स व्यावसायिकांनी आयोजीत केले होते. मात्र, कालपासूनच पोलिस कोरोना निर्बंधाचे कारणे देत बिअर शॉप, हॉटेल्सवर रात्री दहानंतर गस्त घालून बंदची सक्ती केली जात आहे. जमावबंदी असल्याने ग्राहकांना एका ठिकाणी बसता येणार नाही, नियमांचे उल्लंघन होईल. यामुळे सर्वच हॉटेल्स चालकांनी रात्री नऊच्या आतच मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यावर भर दिला आहे.
महसूल बुडेल
रात्री नऊनंतर जमावबंदीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. काही ठिकाणी पोलिस नऊनंतर बंद करताहेत. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे रात्री नऊनंतर वाईन शॉप बंद करा असे आदेश नाहीत. यामुळे वाईन शॉप चालकांमध्ये संभ्रम आहे. ३१ डिसेंबरला जर नऊनंतर बंद ठेवले तर अवैध मद्यविक्री अधिक होण्याची शक्यता आहे. शासनाने याबाबींचा विचार करून रात्री नऊनंतर बंदचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जळगाव डिस्ट्रीक्ट वाईन मर्चंट असोसिएशनचे सचिव पंकज जंगले यांनी केली आहे.