जळगाव (प्रतिनिधी) पहिल्या मजल्यावरील बालकनीची खिडकी उघडून घरात प्रवेश करीत चोरट्यांनी उद्योजक कुंदन भटू सोनी (३१, रा. खेडी शिवार, भुसावळ रोड) यांच्या घरातून रोख ३५ हजार रुपयांसह १५ ग्रॅम सोन्याची पोत व दोन मोबाईल असा एकूण ७० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. चोरट्यांनी घरात स्प्रे मारून ही चोरी केल्याचा संशय सोनी यांनी व्यक्त केला असून याप्रकरणी दि. २२ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ रस्त्यावर असलेल्या आदित्य गोल्डसिटी अपार्टमेंटमध्ये कुंदन सोनी हे उद्योजक वास्तव्यास आहेत. दि. १३ रोजी त्यांच्याकडे कानबाई उत्सवासाठी त्यांचे काका व आत्यासह नातेवाईक आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांनी जागरण करुन ते झोपले. रात्रीच्या सुमारास चोरट्याने बाल्कनीच्या खिडकीतून घरात प्रवेश करीत घरातील सोन्याची १५ ग्रॅम वजनाची पोत, दोन मोबाईल असा एकूण ७५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. १४ रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या विषयी नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर कुंदन सोनी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दि. २२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.
कुंदन सोनी यांचे काका व इतर जण हे सकाळच्या सुमारास झोपेतून उठले. त्या वेळी त्यांना डोकेदुखी व मळमळचा त्रास जाणवत होता. घरात जवळपास २० जण असताना चोरट्यांनी चोरी केल्याने कदाचित त्यांनी स्प्रे मारून सर्वांना बेशुद्ध केले असावे, असा अंदाज सोनी यांनी व्यक्त केला आहे. चोरीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही तपासले असता त्यात दोन चोरटे भिंतीवरून उडी घेत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. अपार्टमेंटच्या या परिसरात सुरक्षा रक्षक व ६४ सीसीटीव्ही कॅमेरे असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करुन ऐवज चोरुन नेला.