बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील आमदगांव येथील एका घरातून रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाखांचा माल चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात कडु गोविंद पाटील (वय ५०, रा. आमदगांव ता. बोदवड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ११ मे २०२२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास बोदवड तालुक्यातील आमदगांव येथील घरातून अज्ञात चोरट्याने २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, चार सोन्याच्या अंगठ्या, दोन सोन्याच्या गहू पोत, १ लाख रोख, असा एकूण ५ लाखांचा माल चोरुन नेला. याप्रकरणी बोदवड पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि अंकुश जाधव हे करीत आहेत.