धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरगाव येथे भरदिवसा एका शेतकऱ्याच्या घरातून सोन्याच्या दागिने आणि रोकड असा साधारण अडीच लाखाचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
बापू धोडू मराठे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते काल सकाळी १० वाजेला सुमारास शेतात गेले होते. दुपारी शेतातील भेंडी तोडल्यानंतर श्री. मराठे यांचा मुलगा घरी परत आल्यानंतर त्याला घराचे दरवाजे उघडे दिसले. घरात शिरल्यानंतर अस्तव्यस्थ सामान बघून घरात चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले.दरम्यान, मराठे दाम्पत्य घराचे दरवाजाचे कुलूप लावून कुलुपाची चावी त्यांच्या घराच्याच खिडकीवर ठेऊन ते पत्नी व दोघं मुलांसह शेतात गेले होते.
याच गोष्टीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील दोन कपाटांमधील २५ ग्रॅम सोने व एक लाख दहा हजाराची रोकड असा साधारण अडीच लाखाचा ऐवज भरदिवसा दुपारी एक वाजेच्या सुमारास चोरीला गेल्याचे लक्षात आले. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, अमोल गुंजाळ, कॉन्स्टेबल बिट हवलदार थोरात, संदीप पाटील यांनी धाव घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ करीत आहेत. दरम्यान घटनास्थळी श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.