भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील मुक्ताईनगरातील रहिवासी डॉक्टरच्या घरातून मंगळवारी भरदिवसा धाडसी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी तब्बल २० तोळे सोने व ६० हजार रुपयांची रोकड, असा एकूण १२ लाख ६० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केलाय.
मुक्ताई कॉलनीतील मंगलमूर्ती हाइट्स या बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर डॉ. तुळशीदास चौधरी हे वास्तव्यास आहेत. त्यांच्या वडिलांचे श्राध्द असल्यामुळे ते मंगळवारी सकाळी सहा वाजेला कुटुंबियांसह आमोदा (ता. यावल) येथे कार्यक्रमाला गेले होते. यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. ही संधी चोरट्यांनी साधली. दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यानंतर शेजारच्यांना संशय येऊ नये म्हणून बाथरूमचा नळ सूर करून कपाटातील सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के यात तीन नेकलेस, आठ अंगठ्या, मंगळसूत्र, एक वेढा, दोन कानातील असे २० तोळे सोने व चांदीचे शिक्के जवळपास दहा भाराचे आणि साठ हजार रुपये रोख रक्कम, असा सुमारे १२ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल लांबवला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरासमोरील रहिवासी गुप्ता यांना चौधरी यांच्या घरात चोरीचा संशय आला. यामुळे त्यांनी डॉ. चौधरींना संपर्क साधला. यानंतर ते भुसावळात आल्यावर कपाटातील दागिने व रोकड लंपास झाल्याचे समोर आले. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, शहर पोलिस ठाण्याचे एपीआय विनोदकुमार गोसावी व डीबी पथकाने घटनास्थळी पाहणी केली.