धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील चोपडा रोडवरील कमल जिनिंगमध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत लाखोंची कपाशी, मका लंपास केला आहे. चोरट्यांनी भिंत फोडून चार चाकीत टाकून साधारण ३५ ते ४० क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका चोरून नेला.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांची कमल जिनिंग आहे. अज्ञात चोरट्यांनी शनिवार रात्री जिनिंगची बाजूची भिंत फोडत आत प्रवेश केला. त्यानंतर फोडलेल्या भिंतीच्या बोगद्यातून साधारण ३५ ते ४० क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका चोरून नेला. कपाशीला ८ हजार रुपये भाव असल्यामुळे तिची किंमत साधारण चार लाखांच्या घरात आहे. तर मका ५० हजार रुपये असा साधारण साडेचार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. घटनास्थळी चार चाकी वाहनाच्या चाकांचे निशाण दिसत आहेत. त्यामुळे चोरट्यांनी मका आणि कपाशी चार चाकीमधूनचे नेल्याचे स्पष्ट आहे.
दरम्यान, आज सकाळी नेहमी प्रमाणे मजूर कामावर आल्यानंतर चोरी ची घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पीएसआय अमोल गुंजाळ आपल्या पथकासह घटनास्थळी हजर झालेत. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत घटनास्थळी पोलीस पंचनामा करत होते. दुसरीकडे कपाशीला चांगला भाव असल्यामुळे भूरटे चोर देखील शेतातून कापूस चोरून नेत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.