धरणगाव ( प्रतिनिधी ) – सर्वत्र वाढत्या अंधश्रद्धा, कर्मकांड आणि अनावश्यक धार्मिक खर्चाला ठाम नकार देत सत्य, विवेक, समता आणि मानवतावादी मूल्यांचा पुरस्कार करणारा सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती विधी चिंतामणी मोरया नगरात पार पडला. या कार्यक्रमातून राष्ट्रपिता, महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई यांच्या विचारांची प्रभावी मांडणी करण्यात आली. धरणगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गिरधर महाजन यांचे पुतणे व माळी समाजाचे उपाध्यक्ष दिवंगत योगराज गिरधर महाजन यांचे चिरंजीव दिवंगत गणेश योगराज महाजन यांच्या गंधमुक्ती व उत्तरकार्याचा विधी सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्यात आला. हा विधी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासह संत महापुरुषांनी समाजासाठी दिलेल्या विवेकनिष्ठ व मानवतावादी विचारांनुसार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संत, महापुरुष व महामातांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना सामूहिक गायनातून सादर करून उपस्थितांमध्ये वैचारिक जागृती निर्माण केली. याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी उपस्थितांना सांगितले की, माणसाने जन्मभर कर्मकांडांचा गुलाम न राहता विवेकनिष्ठ विचार स्वीकारले पाहिजेत. सत्यशोधक विधी म्हणजे मृत्यूनंतरही माणसाच्या विचारांची उंची जपणारी प्रक्रिया आहे. न्याय, समता, स्वातंत्र्य व बंधुतेच्या मूल्यांवर उभा असलेला समाज घडवणे हीच संत-महापुरुषांच्या विचारांची खरी अंमलबजावणी ठरेल. यावेळी माळी समाजाध्यक्ष व्ही. टी. माळी, ज्येष्ठ पत्रकार कडू महाजन व गुलाबराव वाघ यांनी मनोगतातून दिवंगत गणेश महाजन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सत्यशोधक पद्धतीने विधी करण्याची प्रेरणा दिवंगत योगराज महाजन, भटुलाल महाजन, सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्याकडून मिळाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
गंधमुक्ती कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे गायकवाड परिवाराने सामाजिक भान जपत शेत व परिसरात वृक्षारोपण केले. तसेच समाजसेवेचा वारसा पुढे नेत शालेय विद्यार्थ्यांना १०० शालेय दप्तर वाटप करण्याची घोषणा केली. या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाला माळी समाजाध्यक्ष रामकृष्ण महाजन, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, दशरथ बापू, नगरसेवक निलेश चौधरी, भागवत चौधरी, विलास महाजन, हेमंत महाजन, गोरखनाथ देशमुख, लक्ष्मण पाटील, यशोदीप महाजन, दिपक महाजन, श्रीराम महाजन, जितेश महाजन, तेजस महाजन, विनायक महाजन, वासुदेव महाजन, कविराज पाटील, हेमंत माळी, पत्रकार राजेंद्र वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक आर. डी. महाजन यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमातून सत्यशोधक विचारांची प्रभावी मांडणी होत समाजात विवेकवादाची नवी दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
“मृत्यूनंतरही माणूस आपल्या विचारांनी जिवंत राहतो, सत्यशोधक पद्धतीचा संदेश” धरणगावातील हा कार्यक्रम केवळ विधीपुरता मर्यादित न राहता समाजाला अंधश्रद्धेपासून मुक्त करून विवेक, समता आणि मानवतेच्या मार्गावर नेणारा ठोस संदेश देणारा ठरला. कर्मकांडाऐवजी विचारांची परंपरा जपण्याचा हा प्रयत्न आजच्या काळात समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे.













