मुंबई (वृत्तसंस्था) पुणे जिल्ह्यातील दौंडच्या पोलीस उपअधीक्षकांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप करत पुण्यातील एका महिला वकिलाने मुंबईत मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबजनक घटना घडली. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला असून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे.
पुण्यातील दौंड येथील पोलिस उपअधीक्षकाने आपल्याशी छेडछाड करत गुन्हा नोंदवला असा गंभीर आरोप या महिलेने केला आहे. आपली तक्रार घेऊन ही महिला मंत्रालयात आली होती. आपल्यावर अन्याय होत असून आपल्याला न्याय मिळावा यासाठी या महिलेने वारंवार पाठपुरावा केला. मात्र तिला न्याय मिळू शकला नाही, असे या महिलेचे म्हणणे आहे. आपल्याला स्थानिक ठिकाणी न्याय मिळत नाही हे पाहून शेवटी या महिलेने मंत्रालय गाठायचे ठरवले. मात्र, तेथे ही महिला कोणाला भेटली का याची तपशील उपलब्ध होऊ शकलेला नाही.
महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करताच महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात नेले. मात्र माझ्यावर अन्याय झाला असून मला न्याय मिळत नाही, म्हणून मी आत्मदहन करत आहे, असे ती महिला सतत ओरडून सांगत होती. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
















