मुंबई (वृत्तसंस्था) १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात (1993 Mumbai Bomb Blast Case) गुजरात एटीएसने (Gujarat ATS) एक मोठी कारवाई केली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपींच्या गुजरात एटीएसने मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित आरोपी मागील २९ वर्षांपासून फरार होते. अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी उर्फ शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडल्यानंतर चारही आरोपी फरार झाले होते. मागली जवळपास दोन दशकाहून अधिक काळापासून पोलीस या आरोपींचा शोध घेत होते. आरोपी अबू बकर हा मोहम्मद आणि मुस्तफा डोसाचा जवळचा सहकारी होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडल्यानंतर तो परदेशात पळून गेला होता. संबंधित आरोपी काही दिवसांपूर्वी बनावट पासपोर्टच्या आधारे भारतातील अहमदाबाद येथे आले होते. याबाबतची माहिती गुजरात एटीएसला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत चारही आरोपींना अटक केली आहे. आरोपी अबू बकर हा मुंबईतील अब्दुल रेहमान स्ट्रीट परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे.
अटक केलेल्या सर्व आरोपींचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. १२ मार्च १९९३ साली मुंबईतील विविध ठिकाणी १२ साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. यामध्ये अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं होतं. अवघ्या सव्वा एक तासात मुंबईत १२ ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट घडले होते.