जळगाव (प्रतिनिधी) शासनाच्यावतीने महाडीबीटी प्रणालीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चे ऑनलाईन अर्ज भरण्याची व शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील विद्यार्थ्यांचे पुन्हा अर्ज (re-apply) करण्याची अंतिम मुदत ३० जून, २०२१ पर्यंत करण्यात आली आहे. ही मुदत अंतिम राहणार असल्याने यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत कोणत्याही परीस्थितीत वाढविण्यात येणार नाही, याची सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना व महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती इ. योजनेचे शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ३ डिसेंबर, २०२० पासून कार्यान्वित झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील अनु. जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रमाण वाढविण्यात यावे. तसेच आपल्या महाविद्यालयस्तरीय लॉगीननवर प्रलंबित असलेले अनु. जातीचे १९६८ व विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील ६४७८ प्रलंबित असलेले पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून तात्काळ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांचे लॉगीनवर वर्ग करावे.
महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यावेतन योजना तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती इ. योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य यांची राहील. तरी याबाबतची माहिती आपल्या महाविद्यालयात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना द्यावी व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन भरण्याबाबत सूचित करण्यात यावे. असे आवाहनही श्री. पाटील, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.