चाळीसगाव (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र या प्रक्रियेमुळे चाळीसगाव तालुक्यातील हजारो लाडक्या बहिणी गंभीर अडचणीत सापडल्या आहेत. तालुक्यातील तब्बल १ लाख १ हजार ११५ लाभार्थी महिलांना ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
शासनाने दोन महिन्यांची मुदत दिली असली तरी, संकेतस्थळावर वारंवार ओटीपी न येणे, आणि लॉगिनमध्ये विलंब अशा तांत्रिक अडचणींमुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ई-केवायसी करताना ओटीपी येण्यासाठी तासन्तास प्रतीक्षा करावी लागते, आणि आला तरीही संकेतस्थळावर तो टाकण्यासाठी योग्य बॉक्स दिसत नाही, अशी तक्रार अनेक महिलांनी केली आहे. परिणामी महिला आपले मोबाईल हातात घेऊन ओटीपीची वाट बघत बसतात. अविवाहीत लाभार्थ्यांना वडिलांचे ई-केवायसी, तर विवाहित महिलांना पतीचे ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. या माध्यमातून संबंधित कुटुंबाचे उत्पन्न तपासले जाणार आहे.
वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने पात्र लाभार्थीची पडताळणी करण्यासाठी विशेष पोर्टल तयार केले आहे. मात्र हे पोर्टल सुरळीत न चालल्याने महिलांचे काम ठप्प झाले आहे.
लाडक्या बहिणींची वाढली चिंता
जिल्ह्यात जळगाव नंतर चाळीसगाव तालुका सर्वाधिक लाभार्थ्यांचा असून, येथे ई-केवायसी प्रक्रियेमुळे प्रशासनावरही मोठा ताण निर्माण झाला आहे. महिलांचा वेळ आणि श्रम वाया जात असल्याने शासनाने संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात तसेच ई-केवायसीची मुदत वाढवावी, अशी मागणी लाडक्या बहिणींकडून करण्यात येत आहे. राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी आवश्यक असल्याने महिलांमध्ये धावपळ सुरू आहे. मात्र संकेतस्थळ नीट कार्यरत नसल्याने “लाडक्या बहिणींची केवायसी होत नसल्याने, चिंता वाढली आहे!” असे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
 
	    	
 
















