छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) पाच वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना वैजापूर शहरातील मोंढा मार्केट भागात रविवारी (दि. १) दुपारी साडे तीन वाजल्याच्या सुमारास घडली. सार्थक गोकुळ लुटे असे मृताचे नाव आहे.
सार्थक हा दुपारी साडे तीन वाजल्याच्या सुमारास घराजवळच्या सिमेंटच्या पाणी टाकीजवळ खेळत होता. खेळता खेळता तो अचानक टाकीत पडला. ही बाब कोणाच्याच लक्षात आली नाही. थोड्या वेळाने सार्थक घरासमोर दिसत नसल्याने त्याची आई त्याला शोधण्यासाठी बाहेर आली. आवाज देऊन तसेच इकडे तिकडे शोधूनही तो सापडत नसल्याने पाण्याच्या हौदात वाकून पाहिले असता तो त्यात पडलेला आढळला. यानंतर नातेवाईकांनी सार्थकला तातडीने वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत घोषित करताच आईने एकच हंबरडा फोडला. या घटनेमुळे मोंढा मार्केट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.