मलकापूर (वृत्तसंस्था) नदीपात्रात साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा विद्युत शाँक लागून एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाला. प्रसाद उर्फ गट्ट्या संजय गंवर (वय १४), असे मृत मुलाचे नाव आहे. दरम्यान, भावाच्या मृत्यूची वार्ता पोहोचताच पाचही बहिणींनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.
सोमवारी तालुक्यातील बेलाड येथील रहिवासी प्रसाद उर्फ गट्ट्या हा गावाबाहेर पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कालिका नदीच्या पात्रात साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. दुपारी गेलेला मुलगा घरी न परतल्याने घरच्यांनी चौकशीसाठी काही माणसे पाठवली. काही वेळानंतर प्रसादचा मृतदेह आढळून आला. त्याच्या छातीवर जखमा असल्याने विजेचा शॉक लागल्याचा प्राथमिकदृष्ट्या लक्षात येत होते.
दरम्यान, तत्पूर्वी नदीच्या काठावर मच्छीमार सदाशिव भरत दहिभाते याला प्रसाद बाबत विचारले असता त्याने नकार दिला होता. त्यामुळे मृतदेह सापडल्यावर नागरिकांनी त्याला चांगलाच चोप दिला. तरीही त्याने कबुली दिली नाही. थोड्याच वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी सदाशिव दहिभाते याला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच सदाशिवने मच्छीमारीसाठी महावितरण कंपनीच्या पोलवरुन तार डायरेक्ट पाण्या सोडल्याची कबुली दिली.
पाण्यात विजेचा शॉक लागून मृत्यू पावलेला प्रसाद उर्फ गट्ट्या हा एकुलता एक मुलगा होता. दोन भावांना पाच मुली व एकच मुलगा होता. त्यामुळे गंवर कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. पाचही बहिणींचा काळीज चिरणारा आक्रोश बघून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.