अमरावती (वृत्तसंस्था) ‘डीएनए’ चाचणीसाठी पाठवलेला अहवाल तब्बल सव्वाचार वर्षांनी प्राप्त झाला असून अनैसर्गिक कृत्यामुळे झालेल्या रक्तस्रावाने १४ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत नामदेव बळीराम दहीकर (३९, रा. म्हसोना) या संशयित आरोपीला अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, १७ फेब्रुवारी २०१५ रोजी परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका आश्रमशाळेत शिकणाऱ्या मेळघाटातील एका १४ वर्षीय मुलीचा इर्विनमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तिच्या पोटात व छातीत प्रचंड वेदना होत होत्या. तसेच त्यामुळेच अति रक्तस्त्राव झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याबाबत शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी नमूद केले होते. तसेच मृतक मुलीच्या शरीरावर काही जखमा असल्याचेही अहवालात नमूद होते. त्यावेळी हा नैसर्गिक मृत्यू समजून या प्रकरणात परवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
परंतू मृतदेहाची एकंदरीत परिस्थितीवरून परतवाडा पोलिसांना संशय आला होता. त्यामुळे त्यांनी २१ फेब्रुवारी २०१९ रोजी संशयाच्या आधारे नामदेव दीकर याचे रक्तनमुने घेतले होते. पोलिसांनी रक्त नमुने तसेच मृतक तरुणीच्या शरीरावरील स्वॅब घेऊन ‘डीएनए’ चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले होते. या ‘डीएनए चाचणीचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला असून, मृतक मुलीच्या शरीरावरील स्वॅब व नामदेव दहिकरचे रक्तनमुने जुळले आहेत. त्याआधारे पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.