जालना (वृत्तसंस्था) नवविवाहित शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ४ जुलै रोजी घडली. रामदास शिवाजी साबळे (२४) असे मृताचे नाव असून अवघ्या चार महिन्यांपूर्वीच या तरुणाचा विवाह झाला होता.
रामदास हा तरुण ट्रॅक्टरवर बसलेला होता. खाली उतरत असतांना त्याच्या पायात काही घातलेले नव्हते. त्यामुळे त्याला विद्युत तारेचा शॉक लागला. नागरिकांच्या मदतीने येथील रामदास शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रामदासला तपासून मृत घोषित केले. बरंजळा साबळे येथे सायंकाळी पाच वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, सहा बहिणी असा परिवार आहे. तरुणाच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली होती.
रामदासचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्यावर काळाने झडप घातल्याने त्याचा संसाराचा डाव हा अर्ध्यातच मोडला आहे. रामदास हा एकुलता एक मुलगा असून त्याला पाच बहिणी आहेत. तर वडिलांचे वर्षभरापूर्वीच निधन झाले आहे. रामदासच्या संसाराची वेल उमलत असतानाच, काळाने झडप घातली. यामुळे नववधूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, मृतदेह बघितल्यानंतर पत्नीसह पाच बहिणींनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.