पुणे (वृत्तसंस्था) एकाच कुटुंबातील पती- पत्नी आणि मुलगा अशा तीन जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४५), आदिका सुरेंद्र भालेकर (वय ३८) आणि प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय १९, तिघे रा. दापोडी, ता. दौंड, जि. पुणे) अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. ही दुर्दैवी घटना आज, सोमवारी (दि. १७ जून) सकाळी सातच्या सुमारास घडली.
सुरेंद्र भालेकर हे पत्नी, मुलगा, मुलगी हे आपल्या कुटुंबासह सोलापूर जिल्ह्यातून दौंड तालुक्यातील दापोडी येथे काही वर्षांपासून भाड्याने पत्र्याच्या घरात राहत होते. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवित होते. सकाळी सुरेंद्र भालेकर हे अंघोळ करण्यासाठी घराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या लोखंडी तारेवरील टॉवेल घेण्यासाठी गेले होते. या वेळी तारेमध्ये उतरलेल्या विद्युत प्रवाहामुळे त्यांना शॉक बसला. प्रसाद हा आपल्या वडिलांना सोडवण्यासाठी गेला असता त्यालाही शॉक बसून चिकटला. त्यानंतर दोघांना सोडवण्यासाठी गेलेल्या आदिका यांनाही विजेचा शॉक बसल्याने तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
रविवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शेजारच्या घरासाठी गेलेल्या विद्युत वायर खाली येऊन त्याचा विद्युत प्रवाह लोखंडी पत्र्यामध्ये उतरल्याने ही घटना घडली. तिघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे तसेच महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. यवत पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली असून अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.