मुंबई (वृत्तसंस्था) दीड वर्षानंतर राज्यभरातील सर्व शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधला आहे. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होणार नाहीत असा निर्धार करा, असं आवाहनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आणि पालकांना केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. अत्यंत मोजक्या शब्दात मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. संबोधनाच्या सुरुवातीलाच त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना शाळा सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी त्यांच्या शालेय जीवनातील आठवणींनाही उजाळा दिला. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना शुभेच्छा देतो. आपण सगळे जण एकत्र आहोत. एकदा उघडलेल्या शाळा पुन्हा बंद होऊ द्यायची नाही या निर्धारानं आपण नव्या आयुष्याला सुरुवात करुया, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मला माझे शाळेतले दिवस आठवताहेत. सुट्टीनंतर शाळेचा पहिला दिवस उत्साहाने भरलेला असायचा. पूर्वीचा दिवस वेगळेच असायचे. मित्रांना भेटण्याची उत्सुकता, नवीन वह्या पुस्तके, गणवेश मिळायचे. आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला हा आव्हानात्मक काळ सुरू आहे. शाळा सुरू करण्याचा निर्णय घेणे कठीण आणि आव्हानात्मक होतं आणि आहे. मुलं नाजूक असतात, त्यांचे वय घडण्याचे असते. आज आपण मुलांच्या विकासाचे , प्रगतीचे दार मुलांसाठी उघडतो आहोत. त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
मी नेहमी कोरोनाच्या विषयावर टास्क फोर्सशी चर्चा करतो. आपल्या पाल्याची जबाबदारी आपण स्वतः घ्या. कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकविले आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विदयार्थी, शिक्षक, पालक यांना शुभेच्छा देतो. मुलांची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे. ती निश्चितपणे पार पडली जाईल असा मला विश्वास आहे, असंही ते म्हणाले