मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने अनलॉक करताना जीम, ग्रंथालये, उद्याने, रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तरी अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे लॉकडाऊनअंतर्गत लागू केलेल्या तरतुदी ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत सूट दिलेल्या सेवा पूर्वीप्रमाणेच सुरु राहणार आहेत.
राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहे. या काळात शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे महाविकास आघाडी सरकारने स्पष्टे केले आहे. त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. मात्र ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत लॉकडाऊनमधून वगळलेल्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवल्या जातील, असे आदेश मुख्य सचिव संजय कुमार यांनी काढले आहेत. काही महिने लॉकडाउन कायम ठेवल्यानंतर अर्थव्यवस्था ठप्प झाली होती.यामुळे अर्थचक्राला गती देण्यासाठी एक एक सेवा पूर्ववत सुरू केली जात आहे. राज्य सरकारने मिशन बिगिन अगेन कार्यक्रमांतर्गत राज्यात हळूहळू अनेक सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
राज्यातील अनेक सेवा आणि व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असले तरी देखील कंटेनमेंट झोन आणि करोना झालेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन हे नियम पाळावेच लागणार आहे. यामुळे पुन्हा एकदा ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. मिशन बिगिन अंतर्गत परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे सांगण्यात आले आहे. या कळत शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंबलबजावणी करण्यात येणार आहे.