जळगाव (प्रतिनिधी) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेला प्रवीण सुभाष पाटील (रा. बिलवाडी, ता. जळगाव) याला घरफोडीसह विविध गुन्ह्यांच्या संशयातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
बिलवाडी येथील प्रवीण पाटील याने बिलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी सरपंचपदासाठी उमेदवारी केली होती. यामध्ये तो पराभूत झाला होता. त्याने यापूर्वी घरफोड्यासह वेगवेगळे गुन्हे केल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सरपंचपदासाठी प्रयत्न करीत असताना काही दिवसांतच घरफोड्यांचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीवेळी जळगाव तालुक्यातील बिलवाडी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी प्रवीण पाटील याने स्वतःचे पॅनल तयार केले होते. त्यात गावातील काही मंडळींना सदस्यपदासाठी उमेदवारी दिली होती, तर स्वतः सरपंचपदाचा उमेदवार होता. मात्र तो या निवडणुकीत पराभूत झाला होता. प्रवीण पाटील याचा वाळूचा व्यवसाय असण्यासह तो चोरी, घरफोड्या करीत असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याचेही कळते. विशेष म्हणजे प्रवीण पाटील हा जळगाव तालुका सोडून जिल्ह्यात इतर ठिकाणी व जिल्ह्याबाहेर तो चोरी करत असल्याचेही कळते.