मुंबई (वृत्तसंस्था) काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विटर अकांउट ब्लॉक करण्यात आले होते. त्यानंतर आता फेसबुकने इस्टाग्रामवरील पोस्ट डिलीट करण्यास सांगितले आहे. फेसबुकने मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लिहिले की, त्यांना इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट डिलीट करण्याची विनंती केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओसंदर्भातील तक्रारीवर फेसबुकने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे.
नोटीसनुसार, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग (एनसीपीसीआर) च्या १० ऑगस्ट २०२१ च्या नोटिसीनुसार, राहुल गांधींच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे अपलोड केलेली पोस्ट बेकायदेशीर आहे. एनसीपीसीआरच्या सूचनेनुसार, ही पोस्ट त्वरित काढून टाकण्याची विनंती केली आहे. यापूर्वी एनसीपीसीआरनेही राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यासाठी ट्विटरला पत्र लिहिले होते.
एनसीपीसीआरने यापूर्वी फेसबुकला पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल गांधी यांच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले होते. तीन दिवसांनंतर, १३ ऑगस्ट रोजी, त्यांनी फेसबुकला समन्स जारी केले. नोटीसला कोणताही प्रतिसाद न दिल्याने त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले. त्यानंतर कारवाई करत फेसबुकने राहुल गांधी यांना मेल केला आणि फोटो काढून टाकण्यास सांगितले. जेव्हा फेसबुकने राहुल गांधी यांना पाठवलेल्या मेलची प्रत एनसीपीसीआरला पाठवली, तेव्हा बाल हक्क समितीने त्यांना समन्समधून सूट दिली
ट्विटरनेही राहुल गांधींच्या एका ट्विटवर कारवाई केली होती. दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबाचा फोटो राहुल गांधी यांनी पोस्ट केला होता. यावर कारवाई करत ट्विटरने हे ट्विट काढून टाकले.