मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान यांच्या मृत्यूबाबत तसेच युवासेना नेते आदित्य ठाकरे आणि अन्य बाबतीत वादग्रस्त पोस्ट आणि खोट्या बातम्या पसरविणाऱ्या एका वकिलाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विभोर आनंद असे अटक केलेल्या आरोपी वकीलाचे नाव आहे.
आनंद वकील असल्याचा दावा करत असून सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी युवासेना नेते आदित्य ठाकरे आणि अन्य बाबतीत वादग्रस्त पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याचे त्याच्यावर आरोप आहेत. आनंदचे ट्विटर अकाऊंटही सस्पेंड केले आहे. आनंदने कथितरित्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा सुशांत आणि दिशाच्या मृत्यूशी संबंध जोडणाऱ्या वक्तव्याचा व्हिडीओ यूट्यूबवर पोस्ट केला होता. आनंदच्या या व्हिडीओमध्ये दिशा सालियानची हत्या होण्याआधी तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचा दावा केला होता. आनंदने या प्रकरणी बॉलिवूडचे अनेक लोक आणि महाराष्ट्रातील एका नेत्याचे नाव घेतले होते. पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या बातम्या पसरविणे आणि विद्वेशक पोस्ट केल्यावरून ही कारवाई केली आहे.