मुंबई (वृत्तसंस्था) एका अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कास्ट डायरेक्टरला मनसेकडून चोप देण्यात आला. हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष अभिनेत्रीला त्याने दाखवले होते. त्या अभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे तक्रार केली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या अभिनेत्रीसोबत गैरवर्तन करणा-या चौघाजणांना मनसे स्टाईलने चांगलाच इंगा दाखवला आहे.
सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून काम देण्याचे आमिष दाखवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचेही तिने सांगितले. त्याला या अभिनेत्रीने नकार दिला. त्यानंतर तिने हा सर्व प्रसंग घरच्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी मनसेकडे धाव घेत झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सापळा रचत या चौघाजणांना पकडले आणि त्यांना जाहीरपणे चोप दिल्याची माहिती मनसेचे नेते पद्मनाभ राणे यांनी दिली.
त्यानंतर मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट करत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनी सांगितले, ‘या चौघाजणांनी या अभिनेत्रीला ठाण्यातील एका फार्म हाऊसवर बोलावले होते. या अभिनेत्रीच्या मदतीने मनसेच्या कार्यकर्त्यांनी तिथे सापळा रचला आणि यासर्वांना रंगेहाथ पकडले. यावेळी त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या आणि एक पिस्तूल सापडले. या चौघाजणांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. दरम्यान,पोलिसांकडून अधिकृतपणे कोणतेही निवेदन आलेले नाही.
दरम्यान, या चार आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. हे चौघेही लखनऊ येथून आले होते. गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव असे या आरोपींची नावे आहेत.