नागपूर (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील अजनाड येथील महिला बचत गटाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व कर्ज सुविधा मिळवून देण्याचे आमिष दाखवून करण्यात आलेल्या सुमारे ९० लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नाद्वारे केली.
यावेळी बोलताना खडसे म्हणाले की, अजनाड येथील महिलांच्या बचत गटाची रक्कम व्यक्तिगत फायद्यासाठी वापरून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याची बाब २२ ऑगस्ट २०२५ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी प्रशासनाने आतापर्यंत कोणती चौकशी केली, तपासात काय निष्पन्न झाले आणि संबंधित दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली, याबाबत सरकारने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजनाड (ता. रावेर) येथील महिला बचत गटाच्या निधीचा गैरवापर करून सुमारे ९० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी २० ऑगस्ट २०२५ रोजी रावेर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३१८(४) व ३१६(२) अंतर्गत गुन्हा क्रमांक ३४८/२०२५ नोंदविण्यात आला आहे.
तपासामध्ये एक आरोपी निष्पन्न झाला असून तो सध्या फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामिन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. पुढील तपासासाठी पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आदेशानुसार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.















