रावेर (प्रतिनिधी) प्रेमाची मागणी करुन वाईट उद्देशाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाहीतर अल्पवयीन मुलीच्या वडिलांना शिवीगाळ, दमबाजी करत १५ लाख रुपयांची मागणी करुन पैसे न दिल्यास मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची अल्पवयीन मुलगी हिला जयेश मोतीलाल सपकाळे (रा. आदर्श नगर रावेर) याने प्रेमाची मागणी करुन वाईट उद्देशाने तिचा वेळोवेळी पाठलाग केला. मुलीने नकार दिल्याने अमोल इंगळे (रा. अष्टविनायक नगर रावेर) व गणेश विश्वनाथ भावसार (रा. अफूगल्ली ता. रावेर) या दोघांनी जयेश सपकाळे याला साथ देऊन तिघांनी संगनमताने शिवीगाळ, दमबाजी करुन सदरचे प्रकरण मिटविण्यासाठी दिनेश चौधरी यांना १५ लाख रुपयांची मागणी करुन पैसे न दिल्यास मुलीची बदनामी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील या करीत आहेत. दरम्यान, एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.