जळगाव (प्रतिनिधी) प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.
केंद्र शासनाने रब्बी हंगाम २०२१-२२ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुंबई (आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इंन्सुरन्स कं. लि.) यांच्यामार्फत जळगाव जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला असून अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसुचित पिकांकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधीपर्यंत संबधित बँकेस त्याअनुषंगाने विमा हप्ता कपात न करणेबाबत कळविणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी संबधित बँकेस कळविणार नाहीत असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा विमा हप्ता विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.
योजनेंतर्गत समाविष्ट पिके, विमा संरक्षित रक्कम व भरावयाचा पिक विमा हप्ता तपशील
बागायती गहूसाठी विमा संरक्षित रक्कम ३० हजार रुपये असून शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ४५० रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर, २०२१ आहे. बागायती व जिरायती ज्वारीसाठी विमा संरक्षित रक्कम २४ हजार रुपये तर शेतक-याने भरावयाची विमा संरक्षित रक्कम ३६० रुपये प्रति हेक्टर, विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत ३० नोव्हेंबर, २०२१ आहे.
हरभरा विमा संरक्षित रक्कम २७ हजार रुपये असून शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ४०५ रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर, २०२१ आहे. रब्बी कांदासाठी विमा संरक्षित रक्कम ६० हजार रुपये तर शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ३ हजार रुपये प्रति हेक्टर इतकी आहे. विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत १५ डिसेंबर, २०२१ आहे, उन्हाळी भुईमुगसाठी विमा संरक्षित रक्कम ३५ हजार रुपये, शेतक-याने भरावयाची विमा हप्ता रक्कम ५२५ रुपये प्रति हेक्टर, विमा हप्ता भरण्याची शेवटची मुदत ३१ मार्च, २०२२ अशी आहे.
जिल्हयात पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत असुन नैसर्गिक आपत्तींपासून नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, शेतकऱ्यांनी दि. १५ डिसेंबर, २०२१ या अंतिम मुदतीची वाट न पाहता आजपासुनच पिकाचा विमा काढण्यात यावा, जेणेकरुन शेवटच्या दिवशी घाई होणार नाही.
अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील नजीकच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा, सर्व राष्ट्रीयकृत बँक, आपले सरकार सेवा केंद्र, तालुका कृषि अधिकारी कार्यालय (सर्व तालुके), उपविभागीय कृषि अधिकारी, जळगाव/पाचोरा/अमळनेर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव, आकाशवाणी शेजारी, प्रशासकीय इमारत येथे संपर्क साधावा. भारती ॲक्सा जनरल इंन्शुरन्स कं. लि. मुंबई (आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड जनरल इंन्सुरन्स कं. लि.)टोल फ्री क्रं. 1800 103 7712 सामान्य सुविधा केंद्र (सी.एस.सी केंद्र) जळगाव येथे संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.