मुंबई (वृत्तसंस्था) आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आहे. यानिमित्तानं शिवसेनेनं शरद पवार यांच्या कामांचा आणि स्वभावाचा उल्लेख करत स्तुतीसुमनं उधळली आहेत. ८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतो आहे. ‘ठाकरे सरकार’ ही शरद पवारांची अलीकडच्या काळातील सगळ्यात मोठी बेरीज असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, अशा शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. ‘जीवेत शरदः शतम्’ म्हणजे ‘शतायुषी व्हा’ असे आशीर्वाद हजारो वर्षांपासून या देशातील ज्येष्ठ माणसे तरुणांना देत आलेली आहेत, पण वय वर्षे ८० असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश पडलेला आहे. कारण अनेकदा तरुण आराम फर्मावत असतात तेव्हा पवार हे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत असतात, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. शरद पवार यांच्या ८० वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून त्यांची स्तुती केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून विशेष शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
‘शरद पवार लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. पवारांच्या चातुर्यानेच वाजपेयींचे सरकार एका मताने पडले, पण संसदेतील या नेत्यास विश्वासात न घेता सोनिया गांधी राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करायला गेल्या त्या अस्वस्थतेतून वैचारिक मुद्द्यांवर काँग्रेस पुन्हा सोडणारे, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून पुन्हा काँग्रेसच्याच बरोबरीने स्वतंत्र बाण्याचे राजकारण करणारे शरद पवार देशाने पाहिले. नरसिंह रावांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद त्यागून पवार हे राष्ट्रीय राजकारणाच्या आखाड्यात पूर्ण तयारीनेच उतरले. राजीव गांधींच्या हत्येने गांधी परिवार राजकारणातून बाहेर पडलेला, काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन, दुर्बल झालेला, संसदीय काँग्रेस पक्षात तेव्हा मतदान झाले असते तर पवार नेतेपदी बहुमताने निवडून आले असते, पण वानप्रस्थाश्रमात निघालेल्या नरसिंह रावांना उत्तरेच्या लॉबीने पुढे केले व पवारांचा मार्ग अडवला’ अशी खंतही सेनेनं बोलून दाखवली.