मुंबई (वृत्तसंस्था) आरे येथील मेट्रो कारशेड कंजूरमार्गला हलवल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. लटकवणे, अडकवणे आणि भटकवणे असा तिघाडीच्या ठाकरे सरकारचा कारभार असल्याचा आरोप भाजप आ. आशिष शेलारांनी केला आहे.
मेट्रो कारशेड आरेतून कांजुरमार्ग येथे आणण्याबाबात निर्णय ज्या दिवशी ठाकरे सरकारने घेतला त्याच दिवशी आम्ही त्यातील ठाकरे सरकारची अहंकारी वृत्ती मांडली होती.अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र यांच्यामुळे राज्याची अवस्था काय होते, अशा अनेक दंतकथा आपण ऐकल्या आहेतच. मुंबईकर नागरिकांना मेट्रोमुळे मिळणारा सुखाचा प्रवास यापासून वंचित ठेवण्याचे काम अहंकारी राजा आणि मनमौजी राजपुत्र करत आहेत. असे त्याच दिवशी आम्ही सांगितले होते.
मेट्रो कार शेड कांजुरला करण्याचा निर्णय घोषित झाला आहे त्याबाबत सरकारने काही खुलासे करण्याची गरज आहे. असे सांगत आम्ही प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा डीपीआर झालाय आहे का? त्याचा टेक्निकल स्टडी झाला आहे का? त्याचा ऑपरेशनल प्लॅन तयार झाला आहे का? या तिन्ही गोष्टींचा अभाव असताना केवळ एक वाक्य फेकायचं आणि जनतेला भ्रमित करायचे असे चित्र आहे असे आम्ही सांगितले होते. शून्य पैशांमध्ये जागा ही केवळ घोषणा आहे. कारण ज्या जागेवर प्रस्तावित कारशेडचा मुद्दा राज्य सरकार म्हणते आहे, ती जागा मिठागरांची आहे, त्याबाबत मिठागर आयुक्तांकडून परवानगी घेतल्याचे दिसत नाही, त्यामुळे ती जागा जर राज्य सरकारने आपल्या नावावर केली असेल तर त्याच्या वैधतेवरच प्रश्न निर्माण होते.