चोपडा (लतीश जैन) शहरात १७ कोटीची विविध विकास कामे प्रस्तावित असून त्याची निविदा लवकरच निघणार आहे. या विविध कामांचे भूमीपुजन उद्या (दि २२) कामगार व उत्पादन शुल्क विभाग मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिली आहे.
महात्मा गांधी उद्यान सुशोभीकरण करणे (२ कोटी), कस्तुरबा हायस्कूल ते हरेश्वर पूलापर्यंत रस्ता डांबरीकरण व डिव्हायडर करणे २ कोटी व हरेश्वर पूल ते शिरपूर बायपासपर्यंत रस्ता डांबरीकरण व डिव्हायडर करणे २.५० कोटी, अशा या विविध कामांचे भूमीपुजन दि २२ रोजी कामगार व उत्पादन शुल्क विभाग मंत्री दिलिप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभा माजी अध्यक्ष अरुनभाई गुजराथी, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अॅड.संदीप पाटील, भाजपा नेते घनश्याम अग्रवाल, चोपडा पीपल्स बँक अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, माजी आमदार दिलीप सोनवणे, बाजार समितीचे संचालक सुनील जैन, चोसाका माजी अध्यक्ष अॅड. घनश्याम पाटील यांची उपस्थिती लाभणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा मनीषा चौधरी यांनी दिली.यावेळी गटनेते जीवन चौधरी, उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, नगरसेवक अशोक बाविस्कर, कैलास सोनवणे,हुसेनखा पठाण,वसंत पवार,प्रा कांतीलाल सनेर आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा मनिषा चौधरी यांनी सांगितले की, चोपडा शहराच्या सर्वांगिण विकासाठी चोपडा शहर विकास मंच प्रयत्नशिल आहे. नागरिकांच्या सोईसुविधा व नगरपरिषदेच्या उत्पन्नाच्या स्त्रोत विकसीत करणे या दृष्टीने विकास कामांचे नियोजन, त्याकामी निधी मागणी, निधी मिळणेकामी पाठपुरावा करणे याबाबत आम्ही कटीबध्द आहोत. विविध विकास कामे पूर्ण करुन शहराचे सौंदर्य तसेच सुविधांमध्ये भर पडावी व नागरिकांना त्याचा लाभ व्हावा, हाच चोपडा शहर विकास मंचाचा ध्यास आहे. नुकताच दि.१२ रोजी चोपडा नगपरिषदेकडून सामाजिक सभागृह लोकार्पणाचा कार्यक्रम जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडला.
विविध १७ कोटींची कामांची निविदा लवकरच प्रसिध्द होणार
विविध योजनेअंतर्गत प्राप्त अनुदानातुन कामे हाती घेण्यात आलेली आहेत. सदर कामांना प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली असुन लवकरच त्यांच्या निविदा प्रसिध्द करणेत येणार आहे. 14 वा वित्त आयोग अनुदान अंतर्गत रु. 9 कोटीचे कामांना मंजुरी प्राप्त झाली असून त्यात चोपडा न.प. हद्दीतील आ.क्र. 49 वर फिश मार्केट बांधणे व आ.क्र. 102 शाहु महाराज शॉपिंग सेंटर मध्ये तळमजल्यात वाढीव गाळे बांधणे व पहिला मजला बांधकाम व प्रवेशद्वार करणे या महत्वाच्या कामांचा समावेश आहे, नागरी दलित वस्ती योजनेअंतर्गत रु. 2.25 कोटी ची रस्ता व गटारींची कामे,महाराष्ट्र सुवर्ण जयंती नरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) अंतर्गत रु.3.50 कोटी ची रस्ता व गटारींची कामे,नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना अंतर्गत रु.1.83 कोटी ची रस्ते व गटारींची कामे अशी विविध कामे केली जाणार आहेत.