मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्हि आली आहे. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझे उपचार आणि औषधपाणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. कोरोना झाल्यानंतर साधारण सात दिवस क्वारंटाईन राहावे लागते. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीला देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार, हे पाहावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या नेत्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
देवेंद्र फडणीस हे काल लातूर दौऱ्यावर होते. लातूरचा दौरा झाल्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांना ताप आल्यामुळं तो दौरा अर्धवट सोडून ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते. देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वीही कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी फडणवीस यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते.