जळगाव, (प्रतिनिधी) – उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात अयोध्या – प्रयागराज महामार्गावर शनिवारी पहाटे ४ वाजता एक भीषण अपघात घडला. अयोध्या येथे देवदर्शन करून परत येत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या टूरिस्ट बसला वेगाने येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत पिंप्राळा, ता. जळगाव येथील छोटीबाई शरद पाटील (वय ५५) यांचा मृत्यू झाला असून ११ जण जखमी झाले आहेत. जखमी भाविकांवर सुलतानपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.*
धरणगाव तालुक्यातील कल्याणे खुर्द येथील ३० महिला व ५ पुरुष असा एकूण ३५ जणांचा भाविकांचा ग्रुप या बसमध्ये होता. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बसमध्ये एकूण ४४ भाविक होते. सर्व जखमींना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने प्रशासनाकडून सर्व घटनाक्रमाची माहिती घेतली. तसेच जखमी भाविकांना सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. मदत व बचाव कार्यावर पालकमंत्री पाटील, जनप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.
जखमी झालेल्या भाविकांच्या परतीची तात्काळ व्यवस्था करण्यात आली असून रेल्वेचे तिकीट प्रशासनाकडून काढून देण्यात आले आहे. दरम्यान, मृत महिला छोटीबाई पाटील यांच्या पार्थिवास त्यांच्या नातेवाईकांसह जळगाव येथे आणण्यासाठी प्रशासनाने ॲम्बुलन्सची तातडीने सोय केली असून ही ॲम्बुलन्स दुपारीच जळगावकडे रवाना झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले.
जळगाव जिल्हा प्रशासन आणि सुलतानपूर स्थानिक प्रशासन यांच्यात सातत्याने संपर्क ठेवून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. पुढील मदत कार्यासही वेग देण्यात आला असून भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन दक्ष आहे, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आली.
















