अहमदनगर (वृत्तसंस्था) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यानंतर आता मुंडे यांच्या पाठीमागचे शुक्लकाष्ठ संपत असल्याचे बोलले जात आहे. धनंजय मुंडे-रेणू शर्मा हा वाद मिटत असतानाच मुंडे यांच्या समर्थनार्थ अनेकजण समोर येत आहेत. दरम्यान संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ आहेत. असे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी म्हटले आहे.
प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त असल्याचे म्हटलंय. धनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ व संत भगवानबाबा यांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेतले. कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन नुकतेच संपले होते. यावेळी बोलताना इंदुरीकर महाराज यांनी हे वक्तव्य केले. धनंजय मुंडे संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. त्यावेळी तेथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन सुरु होते. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सुरु असल्याचे समजताच मुंडे कीर्तन ऐकण्यासाठी बसले. यावेळी धनंजय मुंडेंना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त आहे, तसेच संतांचे आशीर्वाद प्राप्त झाल्याने माणूस मोठा होतो, याचे मूर्तीमंत उदाहरण धनूभाऊ आहेत, असेही इंदुरीकर महाराज यावेळी म्हणाले.
संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने हेसुद्धा उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी धनंजय मुंडे यांची स्तुती करत, अडचणीच्या काळात मुंडे यांनी खूप मदत केल्याचे लहाने म्हणाले. “राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे कायम गोरगरीब लोकांची सेवा करण्यास प्राधान्य देतात. त्यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द प्रचंड मोठी होणार आहे. त्यासाठी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो,” अशा भावना डॉ. तात्याराव लहाने यांनी धनंजय मुंडे यांच्याप्रति व्यक्त केल्या.