धरणगाव (प्रतिनिधी) राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिलेल्या आदेशानुसार निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. परंतू धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदार यादीत घोळ करण्यात आल्याचा आरोप होत आहे. व्यापारी मतदार संघातील मतदार यादीत वाढीव नावं फक्त राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाढवल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
काय म्हटलंय नेमकं तक्रारीत
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघातील मतदार यादीतून कमी करण्यासाठी तीन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. हरी ट्रेडर्स, जगदंबा ट्रेडर्स आणि आशिष समदानी यांनी या हरकती घेतल्या आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा उप जिल्हा निबंधक यांच्याकडे केलेल्या तक्रारी वजा हरकतीत म्हटले आहे की, मतदार यादीत वाढण्यात आलेली ५७ नावं ही चुकीच्या आणि बेकायदेशीररित्या वाढवण्यात आली आहेत. सदरील सर्व व्यक्ती हे व्यापारी नसून सदरील सर्व व्यक्तींनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कोणताही खरेदी-विक्रीचा व्यवहार केलेला नाही. तसेच कोणताही व्यापार केलेला नाही. सदरील व्यक्तींनी बाजार समितीकडून लायसन्स घेतल्याचे दर्शविल्यापासून कोणतीही बाजार फी बाजार समितीला भरलेली नाही. सदरील व्यक्तींना बाजार समितीने लायसन्स देण्याबाबत कायदेशीर ठराव पारीत केलेला नाही. वाढीव नावं फक्त राजकीय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून वाढवण्यात आली आहेत. वरील नावं ही विहीत मुदतीतील नाहीत. सदरील व्यक्तींपासून बाजार समितीस कोणतेही उत्पन्न मिळालेले नाही. सदरील व्यक्तींना लायसन्स देतेवेळी कोणतेही अनामत बाजार समितीला भरलेली नाही. त्यामुळे दर्शविण्यात आलेले लायसन्स हेच मुळात बेकायदेशीर आहेत. दरम्यान, हरकती सोबत आवश्यक ती सर्व पुरावे दस्तऐवज जोडलेले असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत आज डीडीआर यांच्याकडे या हरकतींवर सुनावणी सुरु आहे. विशेष म्हणजे वाढीव नावं एका विशिष्ठ पक्षाशी संबंधित लोकांची वाढली असल्याचा देखील आरोप होत आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.