जळगाव (प्रतिनिधी) रेशन गहू काळ्या बाजारात जात असल्याचा पोलिसांना संशयातून पोलिसांनी धुळे धरणगाव व पारोळ्याहून धुळ्याकडे एकापाठोपाठ येणारे तीन ट्रक अजंग शिवारात पकडले. यातील तिसऱ्या ट्रकमधील गहू धरणगावहून लोड करण्यात आला होता. यानिमित्ताने पुन्हा एकदा रेशनच्या काळाबाजाराचे ‘धरणगाव कनेक्शन’ पुन्हा उघड झाले आहे. दरम्यान, धरणगावातील रेशनच्या काळाबाजारकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष तर जिल्हाधिकाऱ्यांचे महादुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी केला आहे.
अजंग शिवारात जप्त तिसऱ्या ट्रकमध्ये धरणगावहून भरला माल
धरणी नाल्यात सापडलेले रेशन कार्डचा गठ्ठा असो की, कमल जिनिंगमध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने टाकलेला साठा असो…प्रत्येकवेळी रेशनच्या काळाबाजाराचे बिंग फुटून जनतेसमोर येतच आहे. परंतू याकडे पुरवठा विभाग का दुर्लक्ष करतोय?, या सध्या चर्चेचा विषय बनला आहे. धुळे धरणगाव व पारोळ्याहून धुळ्याकडे एकापाठोपाठ येणारे तीन ट्रक अजंग शिवारात रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पकडण्यात आले. पहिल्या ट्रकमध्ये पारोळा येथील गजानन ट्रेडिंग कंपनीकडून ४९० गव्हाचे कट्टे तर दुसऱ्या ट्रकमध्ये माधव झिपरू वाणी यांच्याकडून २२४ आणि नामदेव बंडू वाणी यांच्याकडून २६० गव्हाचे कट्टे लोड केल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही ट्रकमधील माल दिनेश रामदास पाटील (रा. मामाचे मोहिदे, ता. शहादा) यांनी श्री गजानन ट्रेडिंग कंपनी यांच्या लेटरहेडवर नोंद करून तो माल मोक्ष ट्रेडिंग कंपनी, मार्केट यार्ड, शहादा या ठिकाणी पोहोचविण्यास सांगितला होता. तसे बिल व बाजार समितीचा दाखला आणि वजन काट्याच्या पावत्यादेखील त्यांच्या सोबत दिल्या होत्या. यामुळे हा रेशनचा गहू असून तो काळ्या बाजारात जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
कोणत्मध्ये कुठून भरला गेला माल
ट्रक क्रमांक (ए. के. ३२ डी ९५४४) आणि (ए. के. ३२ डी ९५०८) मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा येथून गव्हाचे पोते भरले. असे असले तरी तीनही ट्रकमधील गव्हाच्या पोत्यांवर शासनाचे शिक्के असल्याने तसेच यातील दोन ट्रकचे धुळे येथे नव्याने वजन करून बिल देण्यात येणार असल्याचे ट्रकचालकांना सांगण्यात आले होते. ही सर्वच बाब संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी ट्रकसह गहू ताब्यात घेतला आहे. यासंदर्भात धुळे तहसीलदार यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. चौकशीनंतर पुढील कारवाई होणार आहे. तिसऱ्या ट्रकमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती धरणगाव येथील अतुल वाणी आशापुरी ट्रेडर्स यांच्याकडून २६० गव्हाचे कट्टे व मोहित यांच्याकडून २६० गव्हाचे कट्टे व मोहित ट्रेडर्स यांच्याकडून २०७ गव्हाचे कट्टे असे एकूण ४६७ कट्टे लोड करून ते खुशाल ट्रेडिंग कंपनी यांच्यामार्फत रायचूर रोलर फ्लोअर मिल हैद्राबाद यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी बिल तयार करून देण्यात आले होते, हे बिल शंकरराव ओंकार शिंदे यांनी बनवून दिले होते. तर तीनही ट्रकमधील गहू हा शहादा येथील मोक्ष ट्रेडिंग कंपनीचे पंकज जसराज जैन यांनी खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
‘धरणगाव कनेक्शन’ पुन्हा उघड
ऑक्टोबर महिन्यात कमल जिनिंग मीलमध्ये नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षकांच्या पथकाने छापा टाकला होता. यानंतर दोन दिवसांची पंचनामा करून हा सर्व प्रकार रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा असल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी ११.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून निलेश नामदेव मुसळे (वय.४५ रा. धरीणी चौक, धरणगाव) आणि शेख आमीर शेख बुडन (वय.३२ रा.मलकापुरा, वार्ड नं.२१, दुर्गानगर, ता. मलकापुरा, जि. बुलडाणा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला होता.
धरणीनाल्यात रेशनकार्डचा सापडला होता गठ्ठा
धरणगावातील धरणी नाल्यात केशरी रेशन कार्डचा एक गठ्ठा काही दिवसांपूर्वी आढळून आला होता. मात्र हे रेशन कार्ड कोणी व का फेकले? याबाबत सव्वा ते दीड महिना उलटल्यानंतरही कोणताही खुलासा झालेला नाहीय. भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी घटनास्थळावरून तहसीलदारांची संपर्क साधून माहिती दिली होती. त्यावेळी याप्रकरणी चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही कारवाई काय झाली?, हे सार्वजनिकरित्या जाहीर करण्यात आलेले नाहीय. अगदी हे प्रकरण दाबण्यासाठी एका तरुणावार दबाव आणून कोऱ्या कागदावर सह्या घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप अॅड.महाजन यांनी त्यावेळी केला होता. आतादेखील धरणगावातील रेशनच्या काळाबाजाराकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष तर जिल्हाधिकाऱ्यांचे महादुर्लक्ष होत असल्याचा आरोप भाजप ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अॅड. संजय महाजन यांनी केला आहे.
















