धरणगाव (प्रतिनिधी) कोलकाता येथील आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात 9 ऑगस्ट रोजी एका ट्रेनिंग डॉक्टरचा बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेचा धरणगाव डॉक्टर असोसिएशन तर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. तसेच महिला कर्मचारी सुरक्षेच्या मागणीचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, कोलकाता येथील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेमुळे एक गोष्ट अधोरेखित झालेली आहे. महिला या त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाहीत. त्यामुळे महिलांना रात्रीची ड्युटी देऊ नये व देणे गरजेचे असल्यास त्यांना योग्य ती सुरक्षा पुरविण्यात यावी. तसेच सदर घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी व कठोर शासन व्हावे यासाठी या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे डॉक्टर असोसिएशन तर्फे पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगरसेविका डॉ. पद्मिनी डहाळे, डॉ. अर्चना काबरा, डॉ. निधी अमृतकर, डॉ. रोहीणी शिदे, डॉ. धनंजय पाटील, डॉ. पंकज अमृतकर, डॉ. चेतन भावसार, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. सुचीत जैन, धरणगाव मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद डहाळे, उपाध्यक्ष डॉ. रमेश पाटील, डॉ. मनोज अमृतकर, डॉ. चेतन पाटील, डॉ. प्रशांत भावे, डॉ. अतुल शिंदे, डॉ स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.