धरणगाव (प्रतिनिधी) येथील गायरानसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी गायरान बचाव मंचाच्यावतीने पशुधन पालक, शेतकरी आदीसह शासकीय गायरान जमिनीच्या बचावासाठी शांततेचा मार्गाने मूक मोर्चाचे १७ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. मात्र, कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या उद्देशाने धरणगाव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
दि. १७/११/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वा गायरान बचाव मंचच्या वतीने धरणगाव येथील गट क्र १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवर मानवसेवा संकल्प प्रतिष्ठाण, मुंबई यांनी केलेले अतिक्रमण जळगाव जिल्हाधिकारी यांनी तात्काळ काढण्याबाबत आदेश धरणगाव तहसिलदार व मुख्याधिकारी, नगरपालिका यांना दिलेले आहेत. परंतु या आदेशाची अंमलबजवणी होत नसल्याने अर्जदार यांनी बालाजी मंदीर, धरणी चौक, कोट बाजार परीहार चौक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक पावतो मुक मोर्चा काढण्याबाबत परवानगी मिळणे संदर्भात अर्ज सादर केला होता. परंतू सदरचे अतिक्रमण हे पीर अहमद कमाली शहा बाबा दर्गा या जागेशी संबंधित असून सदर दर्ग्याशी अनेक मुस्लिम तथा हिंदु लोकांचा भावना जुळल्या आहेत.
सध्या त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव व अन्य ठिकाणी उमटुन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुक मोर्च्याच्या फायदा काही समाजकंटक अफवा पसरवुन गैरफायदा घेवून त्यातुन अप्रीय घटना घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या मुकमोर्च्यामुळे दोन समाजामध्ये गैरसमज होवुन जातीय तेढ निर्माण होवून शांतता भंग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तरी सध्याची परिस्थिती पाहता व वरिष्ठांचे सुचनाचे आधारे धरणगाव पोलीसांनी दि १७/११/२०२१ रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाची परवानगी ही धरणगाव येथील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याच्या उद्देशाने नाकारली आहे. त्यामुळे विनापरवानगी मोर्च्यात सहभागी होवून कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण झाल्यास कायदेशीर कार्यवाहीस सामोरे जावे लागेल.
अर्जदार यांना कायदेशीर व सनदशीर मार्गाने त्यांच्या मागण्या जिल्हाधिकारी तसेच त्यांचे वरीष्ठ अधिकारी यांचे पुढे मांडण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहे. तरीही धरणगाव येथील सर्व समाजातील जनतेला धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात येते कि, कोणत्याही अफवा गैरसमज पसरविणा-या समाजकंटकापासुन सावध राहून अशाच प्रकारच्या पसरणा-या मॅसेज व बातम्यांवर विश्वास ठेवु नये व बातमीची खात्री करण्यासाठी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच गावाची शांतता व सुव्यस्था आबाधित राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे देखील आवाहन करण्यात आले आहे.