धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील गारखेडे येथे मुस्लीम समाजाच्या कब्रस्थानसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत आज मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी एका निवेदनाद्वारे जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे. गारखेडे ता. धरणगाव येथे मुस्लीम समजाची २० घरे असून एकूण लोकसंख्या १२५ इतकी आहे. गावामध्ये मुस्लीम समाजामधील व्यक्तीचे निधन झाल्यास त्याचा अंत्यविधी करण्यासाठी गावामध्ये कब्रस्थानची स्वतंत्र व्यवस्था नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्वजांनी विकलेला गट क्र. ९२ / २ मध्ये अंत्यविधी केला जातो. सदरची क्षेत्र जमीन विक्रीच्या खरेदी खतामध्ये या बाबत उल्लेख असून त्या नुसार या शेतामध्ये शेत मालकाच्या सहमतीने व खरेदी खतातील अटी शर्तें नुसार पिकांचे नुकसान न होता अंत्यविधी पार पाडला जातो. परंतु या जमिनीवर पुन्हा पिक पेरणी केली जात असल्याने कब्रस्थानचे अस्तित्व राहत नाही व प्रेतांची विटंबना होण्याची शक्यता निर्माण होते.
आजही परस्पर संमतीने दफन होत आहे. परंतु भविष्यामध्ये शेत मालकाने शेत विक्री केल्यास किवा त्यांचा वारसदारांनी मनाई केल्यास गावामध्ये मुस्लीम समाजाला अंत्यविधी साठी जागा नाही. संबंधित अडचण लक्षात घेता भविष्यामध्ये होणारे वाद विवाद लक्षात घेता, गावासाठी कब्रस्थानसाठी स्वतंत्र जागा देण्यात यावी. तसेच याबाबत शासन निर्णयामध्ये स्वयंस्पष्ट निर्देश देण्यात आलेले असल्याने कृपया या बाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी आणि अल्पसंख्याक समाजातील गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.