जळगाव प्रतिनिधी – जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात काल (बुधवारी, २३ जुलै) दुपारी घडलेल्या एका घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. प्रशासनातील एका जबाबदार अधिकाऱ्याने दाखवलेल्या धैर्याने सध्या ते चर्चेचा विषय बनले आहेत.
धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी हे जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठक आटोपून परतत असताना, याच बांभोरी पुलावरून त्यांना काही वाळू माफियांनी अवैध वाळू उपसा करताना दिसले.
क्षणाचाही विलंब न लावता, कर्तव्यदक्ष तहसीलदार सूर्यवंशी यांनी आपले वाहन थांबवले आणि थेट नदीपात्रात उतरले.
नदीत पाणी जास्त असतानाही, त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेतली आणि पोहत दुसऱ्या किनाऱ्याकडे निघाले. तहसीलदारांना आपल्या दिशेने येताना पाहताच, वाळू माफियांनी तातडीने पळ काढला.
तहसीलदार सूर्यवंशी यांनीही त्यांचा पाठलाग केला. कर्तव्यनिष्ठेचं अनोखं उदाहरण घालून देणाऱ्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तहसीलदारांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. प्रशासनाचा वचक यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.