धरणगाव (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते संजय माळी यांनी आज मुंबई गाठत धरणगावची पाणी समस्या चक्क विधानसभा उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे मांडली आहे.
शहरातील हनुमान नगर परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते संजय एकनाथ माळी यांनी आज प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची भेट घेत त्यांच्याकडे धरणगावच्या पाणी समस्येचे गऱ्हाणे मांडले. श्री. माळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धरणगावात पाणीटंचाई सुरु आहे. तसेच पाणी पुरवठा झाल्यास तो अशुद्ध होत असतो. तसेच धरणगावातील पिण्याच्या पाण्याची समस्या स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत मिटलेली नाही. ऐन पावसाळ्यात १५ ते २० दिवसात पाणी येतेय. तर उन्हाळ्यात १ महिन्याने गावकऱ्यांना पाणी भेटते. अगदी तो पाणी पुरवठा देखील दुषित असतो. गावात जलशुध्दीकरण केंद्र असून सुध्दा गावकऱ्यांना दुषित पाणी पुरवठा केला जातोय. तरी समस्येचे त्वरित निराकरण करावे व कमीत कमी आठवड्याला एकदा आणि नियमितपणे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात यावे ही विनंती.