धुळे (प्रतिनिधी) नागरिकांच्या सहकायनि साक्री तालुक्यातील विहीरगाव येथे एकाच मांडवात होणाऱ्या सख्ख्या बहिणींसह धुळे शहर व मालपूर येथे प्रत्येकी एक असे चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीला यश आले.
साक्री तालुक्यातील विहीरगाव फाटा येथे बाल विवाह होणार असल्याची तक्रार चाइल्ड लाइन हेल्पलाईनवर प्राप्त झाली होती. त्यानंतर महिला व बालविकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश नेरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण यांनी समन्वय साधून जिल्हा बाल संरक्षण कक्षातील देवेंद्र मोहन, संरक्षण अधिकारी ज्ञानेश्वर पाटील यांचे पथक स्थापन केले.
या पथकाने पोलिस पाटील, ग्रामसेवक अमोल भामरे, सरपंचाशी संपर्क साधला. तसेच निजामपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल रतन मोरे यांनी विहीरगाव येथे भेट देत सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा एकाच मांडवात होणारा बालविवाह रोखला. दुसऱ्या प्रकरणात शहरातील नागसेन नगरात होणारा बालविवाह देवपूर पोलिस ठाण्याला प्राप्त झाली होती. हा विवाह देखील रोखला गेला आहे. या ठिकाणी वर-वधूला हळद लावली जात होती. शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे होणारा बाल विवाह बाल संरक्षण कक्षाचे देवेंद्र मोहन, ज्ञानेश्वर पाटील यांनी पोलिस, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्या मदतीने हा विवाह रोखला.