धुळे (प्रतिनिधी) गर्भपात करतांना कट लागल्याने रक्तस्त्राव होऊन तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात घडली होती. या संदर्भात मुलीच्या वडिलांनी न्यायालयात तक्रार दिली. न्यायालयाच्या आदेशाने तरूणीच्या गर्भधारणेस कारणीभूत ठरणारा तरूण, गर्भपात करणारा धुळे शहरातील खाजगी डॉक्टर या दोघांवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे सुमारे दहा महिन्यांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमृत आनंदा पाटील (रा. उपरपिंड ता. शिरपूर) याने धुळे शहरातील डॉ. एम. एस. रघुवंशी यांच्याकडे एका तरूणीला नेऊन तिचा गर्भपात करण्याबाबत सांगितले. त्याठिकाणी तिचा गर्भपात करण्यात आला. त्यानंतर सदर तरूणीच्या पोटात दुखत असल्याने तिला शिरपूर येथील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती आणखी बिघडल्याने तिला धुळे येथील हिरे मेडीकल रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दि.४ नोव्हेंबर २०२२ रोजी उपचार सुरू असताना रात्री साडेअकरा वाजता तिचा मृत्यू झाला. गर्भपात करीत असताना कट लागल्याने रक्तस्राव होऊन पोटात रक्त साचल्याने इन्फेक्शन होऊन सदर तरूणीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तरूणीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून न्यायालयाच्या आदेशाने सदर तरूणासह डॉक्टराविरूध्द भांदवि कलम ३१३, ३१४, ३०४ – अ, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.